श्रावणमासी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


कवी - बालकवी

नळ सुंदरी

नळावरच्या लायनीत काल जावच लागलं
पुरषासारखा पुरुष असुन
त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं
वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी ऱ्हाली
तीचं करुन करुन माय कमरत वाकली
आज मग बाबुला उदबत्या विकयला धाडलं
आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं
इतक्यात ती समोरुन आली...
मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली
तिचा नंबर आज माझ्या मागंच लागला होता
आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..
सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत...
हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळल होतं...
पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता..
काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला होता..
हा हा म्हणता दोन तास दोन मिनीटात उडाले
शेवटी माझ्याशी बोलण्यासाठी तिने ओठ उघडले..
"नंबर तुझा आहे.. पण मला भरु देशील का पाणी?"
निसत्या आवाजानचं माझ्या मनात नचु लागली गाणी..
येड्यासारखा मग मी नुसताच लाजलो
हसत हसत तिच्या मागे उभ ऱ्हायलो
घागर भरुन होताच घरी लागली जाउ
च्यायला जाता जाता म्हणली..."धन्यवाद भाऊ !!! "

कवी - ऋषिकेश दाभोळकर

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित.

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची,
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची.

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची,
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची.

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी,
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली.

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर.

हिचे स्वरूप देखणे
हिची चाल तडफेची,
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची.

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती,
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती.

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी,
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी.

कवी वि. म. कुलकर्णी.

माय मराठीचे श्लोक !!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रम्हांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

गंगाघर मुटे “अभय”
http://gangadharmute.wordpress.com

फिल्मफेअर अवार्ड्स आणि शाहरुख़, सैफचा उच्छाद.

काल टेलीविज़नवरती फिल्मफेअर अवार्ड्स पहिला. अतिशय प्रतिष्ठेचा अवार्ड्स म्हणून याची गणना केली जाते, परंतु गेली काही वर्ष शाहरुख़ खान आणि सैफअली खान जोड़ीने जो उच्छाद मांडला आहे, तो पाहताना फिल्म फेअर अवार्ड्सच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. त्या दोघांचे स्टेज वरती वागणे आणि बोलणे यात त्यांचा मुजोरीपणा स्पष्टपणे दिसून येत होता.
फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात १९५४ मध्ये झाली. द क्लेरस हे पुरस्कार सोहळ्याचे मुळ नाव, 'द टाइम्स ऑफ इंडिया' च्या क्रिटिक क्लेर मेंडोसा, यांच्या नावावरुन् ठेवले होते. 'Oscar' च्या तोडीचा पुरस्कार म्हणून याची गणना होत होती. हा पुरस्कार मिळवणे म्हणजे अहोभाग्याचे असे कलाकाराना वाटत असे. भले आता कितीही पुरस्कार निर्माण झाले असेना परंतु फिल्म फेअर पुरस्काराची बातच काही न्यारी होती.
सद्या पुरस्कार प्रायोजाकाला काय अवदसा आठवली आहे कोण जाने त्यांनी शाहरुख़ आणि सैफ यांचाकड़े संचालनाची सूत्रे दिली आणि आपल्याच हाताने आपल्याच पुरस्काराची राखरांगोळी केली. प्रतिस्पर्धी कलाकाराना हिणवने, मुर्खासारखे जोक करणे, अश्लील भाषेचा वापर करणे, अगदी चिड निर्माण होइल अशाप्रकारे स्टेज वर वागणे याला तुम्ही मुजोरीपणा म्हणनार नाही तर मग काय म्हणनार?
गेली अनेक वर्ष हया पुरुस्कार सोहळ्याला यांचा मुळे वादाची किनार लाभली आहे. आता हेच पहा ना या सोहळ्याला सैफ कबूतर आणि शाहरुख़ डॉल्फिन झाला होता, मग सैफचे विधान बघा,' अभिषेक बच्चन ने माझा सेक्सुअल वापर केला’ (Delhi 6) मध्ये तर शाहरुख़ साहेब म्हणत होते की अक्षय कुमार मला म्हणाला होता की, माझ्या हिरोइनस तुला खायला देइन पण दिली तर ती गोरी चिगीविगी रस नसलेली. ( Blue) तसेच विशाल भारद्वाजला ते म्हणाले की, तू फक्त शाहिद कपूरला नग्न घोड्याबरोबर पळवले, त्यात शाहिद्चा आणि घोड्याचा एक तरी बोल्ड सीन देयाला हवा होता(कमीने), हे कुठे कमी होते की काय त्यांनी चक्क प्रोडूसर रमेश तोरानीला स्टेजवरती एरोबिक्स करायला लावली आणि दिग्गज कलाकारांचा अपमान कशा प्रकारे करता येइल याची पुरेपुर काळजीही दोघानी घेतली होती.
अशाप्रकारचे पांचट जोक आणि व्यवहार करुण सगळ्याना हसवण्यातच ते धन्यता मानत होते.हा प्रकार अतिशय किळसवाना होता. ते हे का विसरत आहे की शेराला सव्वाशेर हा असतोच आणि तो त्याना नक्कीच भेटणार आणि तो ही पुरस्कार सोहळ्यामध्येच. चित्रपट रसिकांना हेच सांगणे की तुम्ही ज्याना आपले रोल मॉडल मानता त्यांचे हे वागणे तुम्हाला पटते की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. शेवटी प्रेक्षक आहे तर त्यांचे भविष्य आहे हे विसरून चालणार नाही.

काही माणस

काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने,
थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने.

दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना,
त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना.

अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी,
बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी.

माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना,
लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना.

गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना,
डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना.

खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना,
खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना.

तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना.
स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना।

कवी ग्रीष्म


गणेश थोरात

अरे पावसा असा पडू नको दिवसा

२०-२० क्रिकेट सामन्यात पाउस पडताना आपले कृषि मंत्री तेथे पावसाला म्हणतात
शेती मंत्री :- पावसा पावसा असा पडू नको दिवसा ...२
म्हणे माझ्या पोरांना २०-२० क्रिकेट थोड खेळु दे .
आणि माझ्या बीसीसीआई चा गल्ला थोडा अजुन भारू दे ..
तेंव्हा अरे पावसा असा पडू नको दिवसा .

पाउस :- कृषि मंत्र्याला... अरे अरे मंत्र्या माझ्या तोंड सुकलेल्या संत्र्या.....
मी जर पडलोच नाही तर
बळीराजा इथला रडेल रे .
मग तुझाच पाटबंधारे मंत्री शिव्या मला घालून
इथे कृत्रिम पावसा साठी प्रयोग करेल रे
अन मीच लोकांसाठी वाईट ठरेल रे..
तेंव्हा माझ मला पडू दे
तुझी क्रिकेट मैच राहिली तरी रहू दे
तो सचिन सेंचुरी नेहमीच करतो
बळी राजाचा बळी जायला नको
अन त्याचा कर्जाचा हप्ता चुकायला नको.
....
कृषि मंत्री : अरे अरे पावसा असा पडू नको दिवसा ..
बळी राजाचा कर्जाचा हप्ता थकलाच नाही
दुष्काळ जर पडलाच नाही तर
बैंक कर्ज कोणाला देणार
आमचा सावकार कोणाच्या जिवावर जगणार
इथे कुणी आत्महत्या जर केलीच नाही
तर पेपर अन संसदेत आम्ही कशावर बोलणार ....
कुणाच्या कर्ज माफिवर आमच्या बैंकाची देनी आम्ही फेडनार
तेंव्हा तू आपला पडू नको
......
पावसा पावसा असा पडू नको दिवसा ...२
म्हणे माझ्या पोरांना २०-२० क्रिकेट थोड खेळु दे .
आणि माझ्या बीसीसीआई चा गल्ला थोडा अजुन भारू दे ..
तेंव्हा अरे पावसा असा पडू नको दिवसा .


कवी ग्रीष्म.


गणेश थोरात.

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...


राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...
तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...
तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....
सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...
मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ..
मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...
आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ..
कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ..
राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा..
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...
शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा..
राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...
राजे बार झाले तुम्ही लवकर गेले
नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ..
तुमच्या नावासाठी लढताना मेले ते तुमचे मावळे ..
आज तुमच्या नावावर करतात राजकारण
अन भरतात आपली घरे ते आमचे डोम कवळे...
नशीब राजे गड तुम्ही डोंगरावर बांधले
जर असते कधी जमिनीवर तर त्याचे सात बारा ह्यानी नक्कीच बदलले गेले असते...
कवी ग्रीष्म करतो सगळ्याना एक विनंती
रखा पावित्र्य गडाचे आज नाहीतर शोधावे लागतील पुरावे आमच्या इतिहासाचे....


कवी ग्रिष्म


जय महाराष्ट्र!!!
गणेश
थोरात
.

मुंबईकरांचे अष्टविनायक.

मुंबई टाइम्सने निवडलेत मुंबईकरांचे अष्टविनाय. तर र्शन घेऊया आपल्या शहरातील या आठ महागणपतींचं...……

सिद्धिविनायक
, प्रभादेवी

गिरानागावाचा हा देवाधिदेव आता अवघ्या मुंबापुरीचं इष्टदैवत बनलाय. सचिन आणि अमिताभपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा.


महागणपती, टिटवाळा
पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथे आल्यावर लग्न जुळतं अशी एक सार्वत्रिक श्रद्धा आहे.


उद्यान गणेश, शिवाजी पार्क

सिद्धिविनायकाजवळ असूनही याचं महात्म्य कमी झालेलं नाही. गणपती आणि शिवराय ही महाराष्ट्राची दोन दैवतं इथे शेजारी नांदतात.


गिरगाव गणेश, फडकेवाडी

मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहा वर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचं श्रद्धास्थान.


वजिऱ्याचा गणपती, बोरिवली
बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारीका शिलेत हा स्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिका. भक्तांच्या गर्दीचं ठिकाण.


वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व

मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवत. गेली सत्तर वर्ष अंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय.


गणेश संस्थान, गरोडिया नगर, घाटकोपर

पूर्व उपनगरांतलं हे सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर. तुलनेने खूपच नवं असलं तरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते.


फडके रोड मंदिर, डोंबिवली

डोंबिवलीचं
हे ग्रामदैवत. याच्या साक्षीने मराठी माणसाने डोंबिवलीत साहित्य-संस्कृतीची ध्वजा फडकवली. नववर्षाच्या प्रसिद्ध स्वागतयात्रेची सुरुवात इथूनच झाली.

!! गणपती बाप्पा मोरया!! !!मंगलमूर्ति मोरया !!


गणेश थोरात.